सोलापुरला कापड गिरण्यांचे शहर म्हणले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलपूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील 'सोलापूरी चादरी' प्रसिद्ध आहेत.

सोलापुराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापुर तलाव बांधून त्यांनी सोलापुराची पाणी समस्या सोडवली.

पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापुर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापुरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापुरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते.

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापूरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद , दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते.

पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते.

मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.

मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले.